Tuesday, January 31, 2012

गांधीजींची साहित्यसंपदा ई-बुक्‍सच्या माध्यमातून विनाशुल्क देण्याचे ठरवले आहे.

मुंबई - गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या सर्वोदय मंडळाने गांधीजींची साहित्यसंपदा ई-बुक्‍सच्या माध्यमातून विनाशुल्क देण्याचे ठरवले आहे. महात्मा गांधीजींनी लिहिलेल्या असंख्य पुस्तकांसोबतच बापूजींवर लिहिलेले विविध प्रबंध, टिपण, संदर्भही या माध्यमातून गांधीजींच्या चाहत्यांना वाचायला मिळणार आहेत.

सर्वोदय मंडळाच्या संकेतस्थळावरून या पुस्तकाच्या "लिंक्‍स' अभ्यासकांना डाऊनलोड करून घेता येणार आहेत. यंदा मुंबई सर्वोदय मंडळाची पन्नाशी. स्वदेशीचा पुरस्कार करीत असताना सर्वोदय मंडळाने गांधीजींचे विचारधन जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. बापूजींच्या पुस्तकांवर 60 टक्के सवलत देऊन लाखो पुस्तकांची विक्री केली. बापूंनी प्रेम, अहिंसा, शिक्षण, रोजगार, व्यवसाय कौशल्ये, राजकारण, संघटन या प्रत्येक क्षेत्रातल्या सूत्राची व्याप्ती काळाशी सुसंगत करून सांगितली. हे करीत असताना कुठेही गांधीमूल्यांशी सर्वोदयने तडजोड केली नाही. गांधीजींचा विचार "गांधीगिरी'च्या नव्हे तर बापूंच्याच शब्दांतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा, यासाठी यंदा सर्वोदयने तंत्रज्ञानाची कास धरून हा नवा उपक्रम हाती घेतला आहे.

सर्वोदय मंडळाने 1992 मध्ये सर्वात प्रथम संकेतस्थळाची सुरुवात केली. त्याला अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तेथील अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक, सामान्यजन गांधींविषयी असणारी आपुलकी कळवू लागले. बापूंविषयी जाणून घेण्यासाठी त्यांना असंख्य प्रश्‍न ई-मेल्सच्या माध्यमातून येऊ लागले. पुस्तकांची मागणीही वाढू लागली. ही पुस्तके जगभर पोहचवणे शक्‍य असले तरीही आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात ई-बुक्‍सच्या माध्यमातून ती अधिक तप्तरतेने सर्वदूर जातील या विश्‍वासाने ही ई-बुक्‍सची संकल्पना सर्वोदय मंडळाने हाती घेतली.

"गांधीजींना संगणकाचा वापर करणे पटले असते का?' असा प्रश्‍न सर्वोदय मंडळाचे टी. के. सोमय्या यांना अनेकदा विचारण्यात आला. त्यावर ज्या तंत्रज्ञानाच्या विकासाचा लाभ हा समाजातील सर्वात शेवटच्या माणसास मिळू शकतो, त्याचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असतो, ते तंत्रज्ञान निश्‍चितच लाभदायक असते, हा गांधीबाबांचाच विचार सोमय्या उत्तरात देतात. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शिक्षण, आरोग्य, बालविवाह, अध्यात्म, जातीयता, वर्णभेद, समाजकारण, स्वदेशी यांसारख्या विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके ई-बुक्‍सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. हिंदी, मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषेत असणाऱ्या या पुस्तकांप्रमाणेच गांधीजींची काही दुर्मिळ छायाचित्रेही गांधीप्रेमींना मिळू शकतील.

वेगवेगळ्या देशांमध्ये तेथील भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीनुरूप गांधीजींच्या पुस्तकांना असणारी मागणी वेगवेगळी आहे. जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या देशांमधला तरुण गांधी विचारांनी भारावलेला आहे; तर दक्षिण आफ्रिका, युगोस्लाव्हियामधील युवकांना "गांधी' या विषयात संशोधनाच्या शक्‍यता अधिक दिसतात. त्यामुळे या देशांत अभ्यासासाठी मागवल्या जाणाऱ्या गांधी साहित्याची मागणी मोठी आहे.
Source: Sakal 30/01/2012.

No comments:

Post a Comment

BOOK GIST BY ADITI JADHAV SY B ED HI TRAINEE

 https://youtube.com/shorts/92cKYAlt0C8?si=fECtMZgBSklJkcpd  MARATHI VACHAN KATTA 2025  SHARYAT SHIKSHANCHI BY ADITI JADHAV SY B ED HI TRAIN...